मोहाच्या दारूला आता विदेशी दारूचा दर्जा | Mantrimandal nirnay

 मोहाच्या दारूला आता विदेशी दारूचा दर्जा; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय !

Mantrimandal nirnay


आज २० एप्रिल २०२२ रोजी मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या बैठकीमध्ये  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास मान्यता देण्यात आली.

काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणाऱ्या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून “देशी मद्य” असे करण्यात आले होते. 

या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास व मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह  स्थानिकरित्या उत्पादित होणाऱ्या फळे, फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 

या फुलांच्या मद्यार्कापासून निर्मित होणाऱ्या मद्यास “स्थानिक मद्य” असे संबोधण्यात येईल असा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. 

राज्य शासनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती सह महसुलात वाढ करण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे.

काजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून पेय मद्य निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणाऱ्या व नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा  फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. 

स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्काची दुसऱ्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण (ब्लेंडीग) करण्यास मुभा राहणार आहे. फळे, फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून उत्पादित होणाऱ्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.