अवघ्या सव्वा तासात औरंगाबाद पुणे प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा | Aurangabad Pune expressway

अवघ्या सव्वा तासात औरंगाबाद पुणे प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा 

Aurangabad Pune expressway


भारतीय राष्ट्रीय व राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत औरंगाबाद ते तेलवाडी, नगर नाका जंक्शन ते केंब्रीज स्कुल, तसेच शिवूर ते येवला या  3 हजार 317 कोटी किंमतीच्या 86 कि.मी. लांबीच्या 3 महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा व औरंगाबाद ते पैठण या 42 कि.मी. लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरण, दौलताबाद टी पाँईट ते माळीवाडा या 4 कि.मी. रस्त्याचे, देवगाव रंगारी ते शिवूर या 21 कि.मी. रस्त्याचे दुहेरीकरण, कसाबखेडा ते देवगाव रंगारी या 10 कि.मी. रस्त्याच्या दुहेरीकरणात सुधारणा तसेच चिखली-दाभाडी-तळेगाव-पालफाटा या 37.36 कि.मी. रस्त्याच्या दुहेरीकरणाचे काँक्रीटीकरण अशा एकूण 2 हजार 253 कोटी रुपयांच्या 4 कामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बीड बायपास रोडवरील जाबिंदा लॉन्स येथे डिजिटल पद्धतीने करण्यात आले.


यावेळी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाणी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, प्रशांत बंब, संजय शिरसाठ, उदयसिंह राजपूत, नारायण कुचे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री.शेलार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बापूसाहेब साळुंखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती मार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगतीमार्ग 10 हजार कोटी रुपये किंमतीचा असून बीड, नगर आणि पैठण या भागातून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वा तासात पार करता येणार असल्याचा विश्वास श्री.गडकरी यांनी यावेळी दिला.

औरंगाबाद‍ जिल्ह्यात येत्या 2024 पर्यंत 25 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. देशातील सर्व देवस्थाने आणि  पर्यटनस्थळे रस्त्यांची कामे केली. पैठणरोड तसेच पुणे रोडवरील उड्डाणपुलामुळे वाहतूक अडथळा कमी झाला. चिकलठाणा ते वाळूज पर्यंत मेट्रो आणि केंद्र सरकार मिळून डबल डेकर पूल उभारणार आहे. या रस्त्यामुळे औरंगाबाद शहराच्या मोठा प्रश्न सुटेल. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज पर्यंत एनएएचए-4 मेट्रो असा संयुक्त डीपीआर तयार करणार असून हा 25 कि.मी. लांबीचा रस्ता असणार आहे. यासाठी 4 हजार कोटी इतका अंदाजित खर्च लागणार आहे.

औरंगाबादमध्ये मेट्रो प्रकल्पाचे डीपीआर तयार असून या प्रकल्पामध्ये चिकलठाणा ते क्रांतीचौक ते औरंगाबाद रेल्वे स्टेशन असा एकूण 9 कि.मी. डबल डेकर फ्लायओव्हर समाविष्ट आहे. तर दुसरा रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉईंट ते सिडको बसस्टॅंड पर्यंत 13 कि.मी. लांबी असेल यासाठी दोन्ही त्या मेट्रोच्या प्रकल्पामुळे औरंगाबाद शहराचे चित्र बदलेल.


धुळे सोलापूर महामार्ग 52 मध्ये औट्रम घाटातील बोगदा हा 4 पदरी करणार असल्याचा विश्वास देऊन श्री.गडकरी म्हणाले चौसाळा, पाचोड, पारगाव, आडूळ, पांढरी पिंपळगाव, रजापूर, पांढरी गावातील 24 कि.मी. चे अंतर्गत रस्ते एकाच विकास टप्प्यामध्ये पूर्ण करण्याची घोषणा देखील यावेळी त्यांनी केली.

देशात राष्ट्रीय महामार्गांचे काम श्री.गडकरी यांच्या प्रयत्नातून झाले आहे. औरंगाबाद शहर हे राज्याचे औद्योगिक केंद्रबिंदू असल्याने रस्त्याच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत आहे. हरदीपसिंग पुरी यांच्या माध्यमातून शहरात गॅस पाईपलाईनचे काम करण्यात आले असून मुंबई ट्रॉपलर प्रमाणे सी ट्रॉपलरचे काम म्हैसमाळ येथे करण्याचे प्रस्तावित असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.


अजिंठा लेणी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याचे काम श्री.गडकरी यांच्या प्रयत्नातून झाले असे सांगून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, फर्दापूर, चौका घाट कटिंगचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे जेणे करुन शेतकऱ्यांना सोईचे होईल.

रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, सोलापूर-धुळे, शेंद्रा-बिडकीन-कसाबखेडा असा रस्ता झाल्यास एमआयडीसीला उपयुक्त होईल. सोलापूर-धुळे रस्त्याची दुरूस्ती, पैठण-शहागड चारपदरी रस्ता तसेच औरंगाबाद ते पैठण पर्यंत राष्ट्रीय महामार्ग न राहाता तो तिसगाव पर्यंत व्हावा अशी विनंती देखील त्यांनी श्री.गडकरी यांना केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी केले