Ladki Bahin Yojana : रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही
ladki bahin yojana
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.
या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री. यादव यांनी केले आहे.
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.