बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री व्हाट्सॲपवरून तक्रार | Khat bi biyane

राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही; शेतकऱ्यांना  खते, बियाणे कमी पडणार नाही

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री व्हाट्सॲपवरून तक्रार 

khat bi biyane
Khat bi biyane

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे.

राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटक नाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर अशा विक्रेत्यांविरूद्ध तक्रारी ह्या दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मागील वर्षी देखील कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय श्री. मुंडे यांनी घेतला असून, 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे.

त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

 खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 48.34 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 21.31 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 27.03 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.  

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग असून दिनांक 17 जुलै 2023 पर्यंत 66.05 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला असून विमा संरक्षित क्षेत्र 42.30 लाख हेक्टर एवढे  आहे. 

खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कृषीविषयक योजनांच्या  माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्‍यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने केले आहे.

कृषी सेवा केंद्र निहाय उपलब्ध खतांचे आसपासच्या गावाच्या मागणीप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. ऐन हंगामात खत वितरणात सुसूत्रता राहण्यासाठी कृषी सेवा केंद्र निहाय अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तुटवड्याच्या काळात संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत खतांचे वितरण करण्यात येणार आहे. 

विशिष्ट खताचा आग्रह धरू नये.बाजारात पर्यायी सरळ व संयुक्त खते उपलब्ध आहे.पर्यायी खत उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. डीएपीला पर्याय म्हणून एसएसपी + युरिया कॉम्बिनेशन, प्रोम यांच्या वापराला चालना देण्यात येत आहे. पोटॅशला पर्याय म्हणून पीडीएम वितरणासाठी खत कंपन्यांना उद्युक्त करण्यात येत आहे. 

वॉटर सोलुबल फर्टिलायझर्सची उपलब्धता व वापर वाढविणेबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खते, बियाणांच्या उपलब्धतेबाबत तुटवडा भासणार नाही. राज्यात खते, बियाणांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही काळजी करू नये. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे कृषि विभागाने म्हटले आहे.