Shetkari Karjmafi का दिसते कर्जाच्या रकमेत तफावत? कर्जमाफीची केवायसी करावी का?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत तफावत का? 

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची केवायसी करावी का?

Shetkari Karjmafi kyc


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पोर्टल वरील आणि बँकेतील प्रत्यक्षात असलेल्या कर्जाच्या रकमेमध्ये तफावत दिसून येत आहे या संदर्भात राज्याच्या सहकार आयुक्त यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांनी गावपातळीवर प्रसिद्ध यादी व पोर्टलवरील रकमेतील तफावतीबाबत गोंधळून जाऊ नये, पोर्टल वरती दाखवण्यात आलेली रक्कम ही बँकेच्या माध्यमातून केलेल्या तडजोडीनंतरची रक्कम असल्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेचा दोन जून 2026 रोजी जीआर आल्यानंतर राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून 10 जून 2026 रोजी सर्व बँकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एनपीए खात्याच्या सेटलमेंट साठी एक पत्रक पाठवण्यात आलेले आहे. 

या पत्राच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँकांमधील थकीत कर्जदार खात्याच्या बाबतीत एनपीए झाल्याच्या तारखेपासून विशिष्ट टक्केवारीनुसार कर्ज खात्याचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना व प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश करण्यात आलेला असून या योजनेअंतर्गत कर्जमाफी आणि एक वेळ समजवता या बाबी करता पोर्टल वरती सर्व बँकांच्या माध्यमातून 31 लाख 17 हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती सादर करण्यात आलेली आहे.

बँकेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या 31 लाख 17 हजार शेतकऱ्यांच्या पैकी पात्र झालेल्या 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची यादी 25 जुलै 2026 रोजी आधार प्रमाणीकरण अर्थात शेतकरी कर्जमाफी केवायसी प्रक्रियेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्ज घेतलेले सात लाख 3000 शेतकरी असून नऊ लाख 93 हजार कर्ज खाते ही व्यापारी बँकांकडील आहेत.

यामध्ये 10 जून 2026 च्या राज्यस्तरीय बँका समितीच्या दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी बँकांमधील ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाते आहेत त्या कर्ज खात्याची रक्कम ही दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कमी करण्यात आलेली असल्यामुळे तफवत दिसून येत आहे.

राज्याच्या सहकारायुक्तांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण 

काही ठिकाणी गावपातळीवरील यादीतील रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवर दर्शविलेल्या थकबाकीच्या रकमेमध्ये फरक असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत योजनेच्या पोर्टलवर दर्शविलेली थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी. पोर्टलवर दिसणारी थकबाकी ही 31 मार्च 2026 रोजीची असून, शासनाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारलेले नसल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी पोर्टलवरील माहिती मान्य असल्यास आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर त्याची पावती उपलब्ध होईल. या पावतीमध्ये कर्जमुक्ती होणाऱ्या रकमेची माहितीही नमूद असेल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. कर्जमुक्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित बँकेमार्फत कर्ज बेबाकी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत पुढील खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जासंदर्भातील इतर कोणतीही माहिती चुकीची वाटल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवावी. अशा तक्रारींचे निराकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा आव्हान आता सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

#Karjamukti2026 #PAHSKY2026 #ShetkariKarjamukti #SLBCMaharashtra