अशी होणार शेतकरी कर्जमाफीची KYC; नव्या सूचना जाहीर | Shetkari Karjmafi KYC
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६
कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांची KYC आधार प्रमाणीकरण आता फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच; सहकार आयुक्तालयाचे निर्देश
Shetkari Karjmafi KYC
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी राबवल्या जाणाऱ्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे.
या नवीन सुधारित कार्यपद्धतीबद्दल सहकार विभागाचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यासाठी काढण्यात आलेल्या 02 जून 2026 च्या जीआर नुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार नोंदणी अनिवार्य आहे.
त्यानुसार, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून, माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
नवीन कार्यपद्धतीनुसार, आधार प्रमाणीकरण केवळ बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार असून, ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख सुनिश्चित होऊन योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होणार आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती त्यांच्या कायदेशीर वारसांकडून घेऊन योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.
बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से कर्जखात्यामध्ये नमूद करावेत. मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदाराची माहिती नुमना तक्त्यात ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी. वारसांची माहिती भरताना BR-ID, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, AgriStack Registry, CIF, बचत खाते क्रमांक, PAC ID, PACS Membership Number, Loan Account Number आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहिती देणे आवश्यक आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी
या संदर्भातील कार्यपद्धतीची माहिती व आवश्यक सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती तसेच संबंधित बँक शाखांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, आपल्या सरकार सेवा केंद्रे व बँक शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
#PAHSKY #ShetkariKarjmafiKYC