Shetkari Karjmafi - कर्जमाफी KYC कधी, कशी करायची? कर्जमाफी यादी कधी येणार?
कर्जमाफी KYC कधी, कशी करायची? कर्जमाफी यादी कधी येणार?
Shetkari Karjmafi 2026
गेल्या काही वर्षापासून विविध नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची संधी निर्माण करून देणारी योजना आहे.
राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असून ही कर्जमाफी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली असून योजनेची प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये कर्जमाफी योजनेची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. कर्जमाफीचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित ठेवली असणार आहे.
या योजनेअंतर्गत सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
यादी मध्ये नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकेमार्फत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज पाठवून देखील कळवले जाणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी KYC बंधनकारक
शेतकरी कर्जमाफी योजनेची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी आपले पात्र यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी kyc करायची आहे
शेतकऱ्यांना आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह 'आपले सरकार सेवा केंद्रात' किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण अर्थात kyc करावी लागणार आहे. कर्जमाफीच्या यादीतील आपल्या नावासमोरील माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी सहमती देण्याची प्रक्रिया या कर्जमाफी KYC मधून केली जाणार आहे.
कर्जमाफी योजनेची KYC झाल्यानंतर मंजूर असलेली कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. याचप्रमाणे कर्जमाफी योजनेतील 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हिस्साची अर्थात 2 लाखावरील रक्कम भरून KYC करणे आवश्यक राहील.
योजनेच्या पारदर्शकतेवर शासनाने विशेष भर दिला आहे. कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी, म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तसेच या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समितीसुद्धा नियुक्त करण्यात आली आहे.
योजनेसाठी प्रशासकीय सन्मवय
सहकार विभाग, जिल्हाधिकारी, बँका, महाआयटी, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन या सर्व घटकांमध्ये राज्य शासनाने अचूक समन्वय साधला आहे. विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा 'कर्जमुक्त' होऊन 'कर्जपात्र' होणार आहेत. त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
#ShetkariKarjmafi #ShetkariKarjmafi2026 #KarjMafiUpdate #PunyashlokAhilyadeviHolkarKarjmafi #KarjmafiYojana #FarmerIDMaharashtra