Recent Post

Popular Posts

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आधार प्रमाणीकरण, ऍग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक | Shetkari Karjmafi Documents

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण व ऍग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक 

Shetkari Karjmafi Documents

राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऍग्री स्टॅगची नोंदणी आणि आधार चालू मोबाईल नंबरशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी नैसर्गिक आपत्ती दुष्काळ आणि अतिवृष्टी इत्यादी कारणामुळे आपल्या पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, अशी कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्या ना नवीन कर्ज उपलब्ध होत नाहीत.


या शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे.


तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी ‘एकरकमी समझोता’ योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.


शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे थकीत पीक कर्ज असल्यास, शासनाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

माहिती अपूर्ण असल्यामुळे कोणताही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करून अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


कर्जमाफी अर्ज स्वीकारण्याबाबतचे नियोजन निश्चित करणे, आधार कार्ड व अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रलंबित कामे तसेच मयताच्या वारसाच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी जनजागृती व नोंदणी शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६