पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, लाभ घेण्याचे आवाहन | Online crop loan application

पीक कर्ज वितरणासाठी Online पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली विकसित

Online application for crop loan 2022

पीक कर्ज व्यवस्थापन प्रणालीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

पीक कर्ज वितरणासाठी पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, कृषि विभागाचे अधिकारी,  विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी  पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलद्वारे https://hingoli.cropsloan.com या संकेतस्थळावर जाऊन पिक कर्जासाठी अर्ज करावेत. शेतकऱ्यांसाठी त्याचा आधार क्रमांक हा लॉगइन आयडी असून त्यांचा मोबाईल क्रमांक हा पासवर्ड असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रणालीचा उपयोग करुन पिक कर्जासाठी अर्ज करावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नाही त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाममात्र 20 रुपये शुल्क देऊन पिक कर्जाचे अर्ज भरुन त्याची पोहोच पावती घ्यावी.

तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून उद्दिष्ट पूर्ण करावेत, अशा सूचना बँकाना दिल्या. तसेच ड्रॉफ्ट लेवला प्रलंबित असलेले अर्ज कशामुळे प्रलंबित आहेत याबाबत अर्जदाराशी संपर्क साधून माहिती घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. तसेच जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करुन उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश श्री. पापळकर यांनी  दिले. 

खरीप पिक कर्जाचे उद्दिष्ट केवळ 26.18 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट येत्या 15 दिवसात पूर्ण करावेत. ज्या बँका पिक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगून यासाठी सर्व बँकांनी प्रत्येक गावात शिबीरे घेऊन पिक कर्जाचे अर्ज भरुन घ्यावेत. त्यासाठी सर्व बँकांनी वेळापत्रक तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले. 

यावेळी जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सांवत यांनी कर्ज व्यवस्थापन प्रणाली कशी वापरावी याची माहिती सर्व बँकाच्या प्रतिनिधीना दिली. तसेच सर्व बँकाना त्यांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला असल्याची माहिती  दिली.