पशुसंवर्धन विभागातील २५०० रिक्त पदांची भरती होणार | Nokar Bharti 2022

पशुसंवर्धन विभागातील २५०० रिक्त पदांची भरती होणार 

Nokar Bharti 2022

पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज लोकार्पण कार्यक्रमात सांगितले.

माहूरझरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी मंत्री रमेश बंग, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीच्या सभापती  रेखा वर्टी, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, प्रिती अखंड, सरपंच संजय कुंटे यावेळी उपस्थित होते.

पशुपालन व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचे सांगून श्री. केदार पुढे म्हणाले, यापुढील काळात पशु व पक्षी पालनातूनच ग्रामस्थांना स्थानिक रोजगारांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे आरोग्य निकोप राहण्यास मोठी मदत होणार आहे. सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे श्री. केदार म्हणाले.

 कोरोना काळातही  जिल्हा परिषदेने दुधाळ जनावरे, शेळी व गाई यांचे वाटप करुन ग्रामस्थांना आधार दिला. या प्रकारचा पहिला प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आला आहे. त्यातील काही त्रुटी दूर करुन  हा प्रयोग राज्यभर करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी ठरविले आहे, असे  जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले. या काळात जिल्हा परिषदेद्वारे दिव्यांगांना  प्रमाणपत्राचे वाटप घरोघरी करुन त्यांना दिलासा दिला, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येवून बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री रमेश बंग, जिल्हा परिषद सदस्या कुंदा राऊत, पंचायत समिती सभापती रेखा वर्टी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय कुंटे यांनी केले. या कार्यक्रमास माहूरझरी तसेच परिसरातील सरपंच, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.