मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे होणार जून अखेरपर्यंत पूर्ण | Matoshree shet shivar raste

 मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे होणार जून अखेरपर्यंत पूर्ण 

Matoshree shet shivar raste

Matoshree shet shivar rasteग्रामीण भागात शेतरस्ते व मातोश्री पाणंद रस्ते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे ‘रस्ते’ होत आहेत. हे रस्ते गुणवत्तापूर्ण असावेत. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आढावा बैठकीत दिले.

जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मराठवाडा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे , विभागाच्या उपसचिव श्रीमती खोपडे यांच्यासह आठही जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी रोहयो तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उपअभियंता यांची उपस्थिती होती.
मंत्री भुमरे म्हणाले की मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळवून देण्यासाठी रोहयोअंतर्गत शेतरस्ते व मातोश्री पानंद रस्ते हे उपक्रम हाती घेतले आहेत .विभागातील प्रत्येक जिल्ह्याला ठरवून दिलेल्या इष्टांकाप्रमाणे जूनअखेर पर्यंत कामे पूर्ण करावीत. शेतीमधून उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी व यातून शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्नवाढीसाठी शेत रस्ते व पाणंद रस्ते हे सहाय्यभूत आहे. ते वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश रोहयो विभागाच्या अधिकारी यांना दिले. तसेच शेती अंतर्गत येणारे शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे व विहिरी यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनाची देखील रोहयोच्या माध्यमातून अंमलबजावणी करावी.यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, वेळेची उपलब्धता कमी असल्याने पावसाळ्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याचे निर्देश मंत्री भुमरे यांनी दिले.

बैठकीत नंदकुमार अपर मुख्य सचिव यांनी रोजगार हमी योजनेच्या झालेल्या कामाचा आढावा तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या, यावर तांत्रिक मार्गदर्शनही केले. गुणवत्तापूर्ण आणि रोहयोची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मदत होईल या संदर्भात आलेल्या सूचना आणि संबंधित जिल्ह्यांच्या अडचणी ऐकून घेऊन यावर मार्गदर्शन करण्यात आले. विभागाच्या विविध कामांचे प्रमाण पाहता लोकांच्या येणाऱ्या तक्रारी दूर करून पारंपारिक पद्धती प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचे निर्देश नंदकुमार यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. शेत रस्ते व मातोश्री पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतकरी ,भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी लखपती होण्याचा हा मार्ग आहे असे सांगितले.

आढावा बैठकी दरम्यान गेल्या वर्षीचे इष्टांक पूर्ण केलेल्या औरंगाबाद व परभणी जिल्ह्याचे रोहयो विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन, मंत्री भुमरे आणि अपर मुख्य सचिव नंदकुमार व उपस्थित मान्यवरांनी केले. त्याच प्रमाणे या वर्षी मंजूर झालेल्या कामास सुरुवात झालेल्यामध्ये गेवराई ,जिल्हा बीडचे गट विकास अधिकारी सचिन सानप तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका येथील गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांचे अभिनंदनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.