शेतकऱ्यांना आपल्या पसंतीच्या भाषेत शेतीसल्ला, 'किसान सारथी' डिजिटल मंच सुरू | kisan sarthi launched

 

शेतकऱ्यांना आपल्या पसंतीच्या भाषेत योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, यासाठी 'किसान सारथी' या डिजिटल मंच सुरू


शेती व शेती संबंधित शास्त्रज्ञांकडून  शेतकऱ्यांना सल्ला मिळण्याची सुविधा


शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, यासाठी 'किसान सारथी' या डिजिटल मंचाचा प्रारंभ आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांनी केला. आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 93 व्या स्थापनदिनाचे औचित्य साधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मंचाचा प्रारंभ झाला.




दुर्गम क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणारा 'किसान सारथी' हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अभिनंदन केले. या डिजिटल मंचामुळे आता थेट कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांकडून शेती आणि संबंधित क्षेत्रांविषयी व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.


आता शेतकऱ्यांच्या दारापासून ते बाजारपेठ, साठवण-गृहे आणि शेतकऱ्यांच्या पसंतीच्या विक्री केंद्रांपर्यंत कमीत कमी नुकसान होऊन शेतमाल पोहोचता व्हावा या दृष्टीने आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाची मदत घेण्याविषयी संशोधन करावे, असे आवाहन वैष्णव यांनी केले. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय दूरसंचार मंत्रालय सदैव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषी उत्पादनांची वाहतूक वेगाने आणि कमीत कमी वेळात व्हावी या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालय एक योजना आखत आहे.

Kisan sarthi launched 

शेती सल्ला