९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले | Kukkutpalan Yojana 2026
९०% अनुदानावर कुक्कुटपालन योजना, या जिल्ह्यात अर्ज मागवले
Kukkutpalan Yojana 2026
पशुसंवर्धन विभागामार्फत ९०% अनुदानावर २५०० कुक्कुट पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प लावण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अर्ज मागविण्यात आले आहेत
नंदुरबार जिल्ह्यात अंडी उत्पादन व्यवसायास मिळावी, स्थानिक स्तरावर पोषणमूल्ययुक्त अंड्यांची उपलब्धता व्हावी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे अशा उद्देशाने क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO/FPC) व महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील पात्र संस्थांमार्फत प्रत्येकी २,५०० पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. प्रकल्पांतर्गत उत्पादित अंड्यांचा पुरवठा आवश्यकतेनुसार अंगणवाडी, आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृहे तसेच स्थानिक बाजारपेठेत करण्यात येणार आहे. अंडी उत्पादनासाठी आवश्यक "रेडी टू ले" पक्ष्यांचे संगोपन करण्यात येईल. अंडी उत्पादन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पक्ष्यांची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न निर्मितीची संधी उपलब्ध होईल.
या योजनेअंतर्गत ९०% अनुदान दिले जाणार असून उर्वरित १०% हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे.
२५०० कुक्कुट पक्षी क्षमतेचे अंडी उत्पादन प्रकल्प योजना लाभार्थी पात्रता
- कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी (FPO/FPC) किंवा संबंधित तालुक्यातील नोंदणीकृत महिला बचत गट.
- किमान ०.५० एकर क्षेत्रफळाची जमीन उपलब्ध असावी.
- प्रकल्प स्थळी कायमस्वरूपी पाणी व वीज सुविधा उपलब्ध असावी.
- लाभार्थी हिस्सा उपलब्ध असल्याबाबत बँकेचे In-Principle Sanction Letter अथवा ठेव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक राहील.
- कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेल्या अथवा कुक्कुटपालन व्यवसायाचा अनुभव असलेल्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.
प्रकल्प उभारणी साठी अटी व शर्ती
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) लागू असलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.
- नवीन कुक्कुटपालन प्रकल्प शासनाच्या व विभागाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करणे
- दुर्गंधी व माशांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी पक्षीगृहाची जागा निवासी क्षेत्रापासून किमान ५०० मीटर अंतरावर असावी तसेच खाद्य, अंडी व पक्षी वाहतुकीसाठी योग्य असावी.
- पक्षीगृहाची जागा नदी, नाला, तलाव, धरण तसेच विहीर, उचलविहीर व इतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून किमान ४०० मीटर अंतरावर असावी.
- राष्ट्रीय महामार्गापासून (NH) किमान १०० मीटर व राज्य महामार्गापासून (SH) किमान ५० मीटर अंतर राखणे आवश्यक राहील.
- ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपालिकेच्या हद्दीपासून किमान ५०० मीटर अंतरावर जागा असावी.
- जैवसुरक्षा व योग्य वायुवीजनाच्या दृष्टीने पक्षीगृहाची उभारणी निर्धारित निकषांनुसार करणे आवश्यक राहील.
आवश्यक जोडावयाची कागदपत्रे
- नोंदणी प्रमाणपत्र (सत्यप्रत)
- प्रकल्प स्थळाचा ७/१२ उतारा व पाणी उपलब्धतेचा पुरावा
- जमीन भाडेतत्त्वावर असल्यास १० वर्ष वैध भाडेकरार
- वीज उपलब्धतेचा पुरावा
- बँकेचे In-Principle Sanction Letter अथवा ठेव प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला
- प्रशिक्षण अथवा अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल