अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला
Shaktipeeth Mahamarg New Update
अखेर मोठ्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील GR निर्गमित करून या महामार्गाचे नवीन आखणीला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यात शक्तीपीठ महामार्गासाठी दि.०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागपूर गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या ८०२.५९२ कि.मी लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आलेली होती.
या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आलेली आहे.
यानंतर दि.२८.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
संबंधित मा. मंत्री व मा. लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांना (इंडियन रोड काँग्रेस विशेष पब्लिकेशन क्र.१९:२०२० च्या मूल्यांकन मॅट्रीक्स) अनुसरुन प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करुन तुलनात्मक दृष्टया सर्वाधिक सुयोग्य अशी सुधारीत आखणी अंतिम करुन प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून, ४० तालुक्यांमधून जात असून सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे माहूर, तूळजापूर, कोल्हापूर यांचेसह २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः ८ तासावर येणे अपेक्षित आहे.
या आखणीनुसार वर्धा, यवतमाळ, बीड व लातुर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवण्यात येणार आहे तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करुन व सातारा जिल्ह्यामधील आखणी नव्याने करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
या महामार्गाच्या अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग दिग्रज, ता.जि. वर्धा ते बांदा, ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग पर्यंत (साखळी क्र. कि.मी. ०.००० ते कि.मी. ८५६.७६५) सुधारीत आखणीस मान्यता देण्यात आली आहे.