मतदार नोंदणी संधर्भात निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
voter registration 2023
राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
भारतीय लोकशाही बळकट करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर तसेच मतदारांच्या दृष्टीने निवडणुका सुविधाजनक होतील यावर भर देण्यात येत आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने राज्यात 21 जुलैपासून घरोघरी अधिकारी हा उपक्रम सुरु करण्यात आला असून 21 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याविषयी थोडक्यात…
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या एक महिन्यादरम्यान घरोघरी भेट देऊन मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करणार आहेत. या मोहिमेद्वारे मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेणार आहेत. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया, यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
घरोघरी अधिकारी या उपक्रमामुळे राज्यातल्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत. स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी.
मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार यापैकी एका तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी, बारावीचे प्रमाणपत्रे यापैकी एका पुराव्याची आवश्यकता आहे.
निवडणूक प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी सहकार्य करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्तव्यभावनेने सुटीच्या दिवशी आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी येत असताना त्यांना प्रतिसाद देऊन 100 टक्के मतदार नोंदणी करून अभियान यशस्वी करावे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसमावेशकता आणि मतदारांचा सहभाग असल्यास लोकशाही यशस्वी ठरते. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असताना युवा मतदारांची नोंदणीची टक्केवारी खूपच कमी आहे. हे चित्र बदलण्याची गरज असून युवांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे आवाहन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.
मतदारांनी निवडणूक आयोगाचे ॲप आणि संकेतस्थळाचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून घ्यावे. 21 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा निवडणूक प्रक्रियेचा कणा आहे त्यांच्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी साथ द्यावी.
मतदारांशी संबंधित सर्व प्रकारच्या अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. मतदार नोंदणीकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होईल. सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत व हा उपक्रम यशस्वी करावा.
आजपासून ते २० ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार असल्याचं श्री. देशपांडे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे, तसंच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची निश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे असं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केलं आहे.
मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केलं आहे.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी
नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा
17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल.
सन 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.
भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या एक जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या उत्तरार्धात (साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) केले जात होते. जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे.
आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे. हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज (दावे आणि हरकती) प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.
मतदार केंद्र सुसूत्रीकरण
वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे 1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.
इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी
मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाचे तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.
अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी
अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.