महावितरणतर्फे रूफ टॉप सोलर योजनेबाबत प्रोत्साहन मेळावा
वीज खर्चात बचतीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी सौर ऊर्जा हा एकमेव उपाय असून त्यासाठी महावितरण कार्यालयातर्फे रूफ टॉप सोलर योजनेबाबत विद्युत भवन प्रशिक्षण केंद्र, येथे प्रोत्साहन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महावितरण अंतर्गत सौर ऊर्जेव्दारे प्रदुषण विरहीत विज निर्मितीला मोठया प्रमाणावर चालना देण्यासाठी रूफ टॉप सोलर ही योजना राबविण्यात येत आहे.
प्रदुषण विरहीत हरित वीज, वीज खर्चात बचत, एकदाच गुंतवणुक व त्वरीत परतावा, कमीत कमी देखभाल खर्च यासाठी सौर ऊर्जा महत्वाचे आहे. योजनेमध्ये घरगुती ग्राहकांकरीता 1 कि.वॅ. ते 3 कि.वॅ. पर्यंत 40 टक्के तसेच 3 कि.वॅ. चे वर ते 10 कि.वॅ. पर्यंत 20 टक्के केंद्राकडून वित्त सहाय्यक (अनुदान) देण्यात येणार आहे. गृह निर्माण संस्था / निवासी संघटनासाठी सामुहिक वापराच्या वीज जोडणीकरीता 10 कि.वॅ. / घर आणि 500 कि.वॅ. पर्यंत 20 टक्के केंद्राकडून वित्त सहाय्यक (अनुदान) देण्यात येणार आहे.
रूफ टॉप सोलर योजनेचे फायदे जास्तीत जास्त ग्राहकांना मिळण्याकरीता त्यांनी योजनेमध्ये सामील होण्याबाबत महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेश नाईक यांनी आवाहन केले.