ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाची नोंद करावी | Sugarcane Epeek pahani 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाची नोंद करावी

Sugarcane Epeek pahani 2022


राज्यामध्ये ई-पीक पहाणी प्रकल्प दि. 15 ऑगस्ट, 2021 पासुन सुरु झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. 

सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना दिल्या असुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याचे आवाहनही एका पत्रकाद्वारे केले आहे. 

शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova  या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या ॲपवर जिल्हा, तालुका, गाव व गटनंबर, नाव निवडून स्वत:च्या शेतामध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद करावी. एका मोबाईलवर 50 शेतकरी ई-पीक पहाणी ॲपद्वारे पिकाची नोंद करु शकतात. 

 साखर कारखान्यांकडे ऊस नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदी कराव्यात. साखर कारखान्यांनी आपल्या शेती विभागाच्या मदतीने ई-पीक पहाणी ॲपमध्ये ऊस पिकाच्या नोंदीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करत शेतकऱ्यांना माहिती देऊन कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ॲपद्वारे गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये ऊस पिकांच्या नोंदी करुन घ्याव्यात. जेणेकरुन अचूक ऊस पीक क्षेत्राचा अदांज करता येईल व कारखान्यांनाही नक्की किती ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, याचीही माहिती मिळेल.

साखर कारखान्यांच्या शेती विभागामार्फत ऊसाच्या नोंदी करण्यासाठी ई-पीक पहाणी ॲपद्वारे करण्यासाठी कारखाना व गट ऑफीसस्तरावर मोबाईल ॲप सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच तलाठी व कृषि सहाय्यकांची यासाठी मदत घ्यावी. गाळप हंगाम 2021-22 सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या ऊस पिकांच्या नोंदी गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये होतील, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.