माझा सातबारा मीच नोंदविणार पीक पेरा, ई पीक पाहणी सुरू | Epeek pahani 2022

शेतकऱ्यांनी  ई-पीक पहाणीमध्ये पिकाची नोंद करावी
खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची ई-पीक पाहणी कार्यक्रम 1 ऑगस्ट, 2022 पासुन सुरू झाला आहे. चालु खरीप हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये करण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.

पिकांच्या नोंदीसाठी नवीन ॲपची निर्मिती 
ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे.

48 तासांत खातेदाराला दुरुस्तीची सुविधा
शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपमध्ये नोंदविलेल्या पीक पाहणीमध्ये 48 तासांच्या आत दुरुस्ती करता येईल. याशिवाय हमीभावाने नाफेडमध्ये पिकाच्या विक्रीसाठी नोंदविल्याची सुविधादेखील यंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीसाठी ताटकळण्याची गरज राहणार नाही.

संपूर्ण गावाचे पीक पाहण्याची सुविधा
यावेळी खातेदारांना त्यांच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकाची नौद करता येत होती. या हगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदीची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
ई-पीक पहाणी ॲपद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद शेतकऱ्यांना स्वत: शेतामध्ये जाऊन करावयाची आहे. पिकाची नोंद न केल्यास आपला 7/12 वरील पीकाची नोंद कोरी राहील व शेतकरी शासकीय योजनेपासुन वंचित राहतील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद वेळेत ई-पिक पाहणीमध्ये करण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.