जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Falbag lagwad scheme
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत असून आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे, झाडांची गर्दी होणे आदी बाबीमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणेच राज्यात जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे महत्वाचे असून त्यासाठी २०२३-२४ मध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे.
या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम ४० हजार रूपये प्रति हेक्टर ग्राह्य धरून त्याच्या ५० टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम २० हजार रूपये प्रति हेक्टर या प्रमाणे तसेच कमीत-कमी ०.२० हेक्टर व कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी अस्तित्वातील आंबा फळपिकाचे वय कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ५० वर्षे, चिकू - कमीत कमी २५ ते जास्तीत जास्त ५०, संत्रा- कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २५ वर्षे तर मोसंबी फळपिकाचे वय कमीत कमी ८ ते जास्तीत जास्त २५ वर्षे असे राहील.
योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के. पी. मोते यांनी केले आहे.