विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान सहाय्य मिळून उत्पादन खर्च कमी करता यावा यासाठी 'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा सोमवारी(दि.16) वरुळ-जऊळका ता.अकोट येथील सिमा काठोळे यांच्या शेतात शुभारंभ केला. त्यावेळी पालकमंत्री कडू बोलत होते.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांतप्पा खोत, तहसिलदार निलेश मडके, सरपंच उषाताई कठोळे, उपसरपंच दीपक शेटे, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, मंडळ कृषी अधिकारी अतुल भारसाकळे, कृषी सहायक संदीप सोनोने आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे.
त्या अनुषंगाने विधवा शेतकरी महिलाकरीता ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करा, असे निर्देश कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.